Wednesday, 10 January 2024

माझी favorite व्यक्ती


आज तिचा द्वितीय स्मृतिदिन! दोन वर्षांपूर्वी आजच्या तारखेला जेव्हा मी ऑफिसला निघाले, तेव्हा वाटलं सुद्धा न्हवतं की मी माझ्या आज्जीला शेवटचं बघतिये. नेहमी प्रमाणे सकाळी आवरून, घरून निघायच्या आधी तिला नमस्कार केला. त्यावेळी तिने तिला जमेल तितकी, असलेली ताकद लावून हात उंचवायचा प्रयत्न केला आणि 'खूप खूप आशीर्वाद' हा तिचा नेहमीचा आशीर्वाद द्यायचा प्रयत्न केला, तेव्हा फक्त 'हुं' एवढाच आवाज तिचा तोंडून निघाला. तो आवाज सुद्धा माझासाठी मोठी गोष्ट होती. कारण तिला अंथरुणाला खिळून आता चार महिन्यांहून अधिक काळ लोटला होता. तिचं जेवण कमी होऊन फक्त पाणी-दूध यावर आलेलं. शरीर जीर्ण होऊन दुसऱ्यावर अवलंबलेलं, दृष्टी क्षीण झालेली, हळू हळू एक-एक अवयव साथ सोडून चालेला. तिची जगायची इच्छा सुद्धा मावळली होती. 

रोज उठून हरिपाठ म्हणून झाला की त्या पांडुरंगाला म्हणायची, "बस झालं आता, वर ने मला". त्यावेळी आम्ही तिला म्हणायचो, 'पांडुरंग 'बिझी' आहे, त्याला वेळ नाहीये तुला घेऊन जायला आणि तसं पण स्वर्गाचं बुकिंग सध्या 'फुल्ल' आहे बघ, त्यामुळे तुला काय इतक्यात तरी तिकीट नाही मिळणार." ती यावर कसनुसं हसायची! 

हरिपाठ म्हणणे आणि तुळशीला पाणी घालणे याचं तिला खूपच 'obsession' होतं. चालायचं - फिरायचं बंद झाली, तेव्हा आमचाकरवी ती तुळशीला पाणी घालून घ्यायची. एक तुळशीचं वृंदावन तिचा हातावर गोंदलेलं होतं, त्याच सोबत ४ आकृत्या सुद्धा होत्या. त्या आकृत्या काय आहे असं विचारल्यावर ती म्हणायची की हे भाऊ-बहीण आहेत. तू 'टॅटू' काढलंय आज्जी, तेव्हा म्हणायची नाही हे गोंदण आहे - वर गेलो की देव विचारतो, 'नांदून आलीस पण गोंदून नाही आलीस? म्हणून गोंदून घ्यावं', असं सांगायची.       

दुसऱ्याला खाऊ घालणं हा जणू तिचा सगळ्यात आवडता छंद होता. आवर्जून भेळ, चणे, दाणे, फळं, पेढे ती आणायला सांगायची. कोणीही भेटायला येऊ दे, सगळ्यांना खाऊ द्यायची आणि सोबत 'खूप खूप आशीर्वाद' असं भरभरून आशीर्वाद द्यायची. 

माझ्यासाठी आणि बनीसाठी खास ती पेढे ठेवायची. मी ऑफिस मधून आले मला एक पेढा द्यायची. कधी कधी बनी तिने माझ्यासाठी जपून ठेवलेला पेढा गुपचूप जाऊन ढापायचा, तेव्हा ती त्याला उगा रागे भरायची, जे तिला आयुष्यात कधीच जमलं नाही. 

तिने कधी कोणाला रागावलंय, ओरडलंय, चिडलीये किंवा मारलंय असं कधीच नाही झालं. उलटं, प्राची-पिटू आई -डॅड्डीचा मार बसण्यापासून वाचण्यासाठी तिची ढाल बनवायचे. त्यावेळी, नका मारू पोरांना असं म्हणायची. कधी आम्हाला जर 'न जेवायची' शिक्षा मिळाली, तर ती सुद्धा जेवत नसे. पोरं नाही जेवली तर मी पण नाही जेवणार, असं ती म्हणे. मग आई-डॅड्डीना काहीच पर्याय उरत नसे, आणि आमची भोजनाची सोय होत असे. असं अनेक वेळा आमची शिक्षा आपोआप कमी होत असे. 

मी शाळेत असताना सहलीच्या वेळी डब्यात मस्त पोहे आणि थालीपीठ द्यायची. सोमवारी डॅड्डीसाठी साबुदाणा खिचडी केली की चव बघण्यासाठी मला सर्वात आधी द्यायची. तिने केलेली लसूण चटणी तर केवळ अप्रतिम! मोठ्या शाळेत जायला लागल्यावर ती मला खाऊसाठी १-२ रुपये सुद्धा द्यायची. मला आवडतं म्हणून खास माझ्यासाठी केळी वेफर्स आणायची. आज्जीने माझे खूप जास्त लाड पुरवलेत. 

आई कनेरसरला असायची तेव्हा आज्जीच मला दूध-पोळी, वरण-भात रोज स्वतःच्या हाताने भरवायची. शेवटी- शेवटी ती जेव्हा आजारी पडली तेव्हा तिला भरवायची जबाबदारी मी घेतली. तिला माझ्याहातचं सूप खूप आवडायचं. एक दिवस तिला जेऊ घातल्यावर मी तिला हट्ट केला की ५ मिनिटं तरी बस. तिचासाठी त्यावेळी ही खरंच अवघड गोष्ट होती. पण माझा हट्ट म्हणून ती बसली. मग मी तिचा मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणाले आज्जी माझे लाड कर. त्याही परिस्थितीत तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. आजही तो स्पर्श मला चांगलाच जाणवतो आणि मन भरून येत. 

आज्जी जाऊन दोन वर्ष झालीत, पण रोज तिची आठवण येते. तिने सुरकुतल्या हातांनी भरभरून दिलेले खूप खूप आशीर्वाद मी खूप जास्त 'miss' करते. ती म्हणायची, पना लग्न कधी करणारेस? त्यावेळी मी तिला उडवाउडवीची उत्तरं द्यायचे. कधी कधी असं वाटतं, वर गेल्या नंतर तिने बहुतेक देवाकडे माझी setting केली असावी आणि तिची इच्छा मरणोत्तर पूर्ण करून घेतली असावी, कारण तिच्याच शुभाशीर्वादाने तिच्या सारखा प्रेम करणारा जोडीदार आणि जीव लावणारं सासर मला लाभलं. जेव्हा असं काही घडतं तेव्हा वाटतं आज्जी कुठेच नाही गेलेली ती इथेच आहे, मला खूप आशीर्वाद द्यायला. 

आज तिचे द्वितीय पुण्यस्मरण आहे, तेव्हा जाणवतं शरीराने जरी आज्जी इथे नसली तरी आज्जी इथेच आहे, माझ्या आठवणींत. आणि तिने दिलेले आशीर्वाद कायमचं माझ्यासोबत आहेत. तरी पण 'Miss You आज्जी'. Love you!